गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी पथक-१ची कारवाई : आरोपी दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथक-१ने अटक केली. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार झाला होता. ही कारवाई पुण्यातील बालाजीनगर येथील के. के मार्केट येथे करण्यात आली.
गणेश रामलु मोडावत (वय-29 रा. शिवमल्हार कॉम्पलेक्स, पुण्याईनगर, बालाजीनगर, धनकवडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचे पोलीस घेत होते. त्यावेळी दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी बालाजीनगर येथील के. के. मार्केट जवळ उभा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी के. के. मार्केट परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पुढील कार्यवाहीकरीता दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस हवालदार निलेश शिवतरे, पोलीस नाईक गणेश ढगे, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, महिला पोलीस अंमलदार तेजाराणी डोंगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
