पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई : मित्रमैत्रिणींवर शायनिंग मारण्यासाठी केला ‘उद्योग’
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मित्रमैत्रिणींवर शायनिंग मारण्यासाठी त्यांनी थेट मध्य प्रदेशातून पिस्टल, रिव्हाल्व्हर आणली होती. इतरांवर रुबाब दाखवणे आता त्यांना चांगलेच महाग पडले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ५ जणांच्या या टोळक्याला अटक केली असून, त्यांच्याकडून ४ गावठी पिस्टल, १ रिव्हॉल्व्हर, १३ जिवंत काडतुसे, ४ मोबाईल असा एकूण २ लाख ९१ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला.
दिनेश महादेव मोरे (वय २३, रा. राहु, ता. दौड, जि. पुणे), अभिषेक उर्फ बारकु राजेंद्र शिंदे (वय २०, रा. भांडवाडी महात्मा फुले चौक, राहु, ता. दौड, जि. पुणे), अमोल शिवाजी नवले (वय ३०, वर्ष, रा. कुंबडमळा, सहकारनगर, राहु, ता. दौड, जि. पुणे), सचिन शिवाजी चव्हाण (वय २३, रा. मारूती मंदिरामागे राहु, ता. दौड, जि. पुणे), परमेश्वर दशरथ कंधारे (वय २३, सध्या रा. भांडवाडी- राहु, ता. दौड, जि. पुणे, मुळ रा. वडीपुरी ता. लोहा जिल्हा नांदेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
यवत पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक सोसायटी निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध शस्त्रे बाळगणार्याविषयी माहिती घेत होते. पोलीस हवालदार निलेश कदम व गुरुनाथ गायकवाड यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, राहु येथील महात्मा फुले चौकात दिनेश मोरे व त्याचे साथीदार थांबले असून त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहेत. या माहितीनुसार, पोलिस तेथे गेले. तेव्हा तेथे पाच जण थांबलेले दिसले. पोलिसांनी अचानक झडप घालून त्यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ४ गावठी पिस्टल, १ रिव्हॉल्व्हर, १३ जिवंत काडतुसे आढळून आली.
सर्व आरोपी ड्रायव्हर, मजुरी काम करणारे असून, त्यांच्यातील एकाची टपरी आहे. त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. केवळ इतरांना दाखविण्यासाठी त्यांनी ही शस्त्र मध्य प्रदेशातून आणली होती, असे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार निलेश कदम, पोलीस हवालदार गुरूनाथ गायकवाड, पोलीस हवालदार संतोष कदम, पोलीस अंमलदार रामदास जगताप, रविंद्र गोसावी़, अजित काळे, प्रमोद गायकवाड, अजिक्य दौंडकर यांच्या पथकाने केली आहे.
