कोरेगाव पार्क पोलिसांची कामगिरी : चार गुन्हे उघड, एक लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे ः जबरी चोरी करणाऱ्या तडीपार आरोपीच्या कोरेगाव पार्क पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीकडून बजाज पल्सर, डीओ मोपेड, रोख रक्कम, अॅपल कंपनीचा मोबाईल असा एकूण एक लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याकडून चार गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
शकिल शब्बीर शेख (वय २२, नारायण स्वीट होमच्या पाठीमागे, एकता नगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज आणि सूत्रांच्या माहितीवरून तपास सुरू होता. दरम्यान, संशयित आरोपी एकतानगरमधील आंबेडकर चौक परिसरात फिरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याचा साथीदार श्रीसेन ऊर्फ चपट्या दयानंद कोऱ्हाळे (रा. ताडीवाला रोड, श्री पंचरत्न हॉटेलशेजारी बंडगार्डन, पुणे) यांनी खून केल्याची कबुली दिली. शकिल शेख पुणे आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व जिल्ह्यातून २० मे २०२० पासून दोन वर्षांकरिता तडीपार केला असून, त्याने तडीपारीच्या कालावधीत कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत खून केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीवर येरवडा-८, विमाननगर-१, कोरेगाव पार्क-२ असे एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून बजाज पल्सर, डीओ मोपेड, रोख रक्कम, अॅपल कंपनीचा मोबाईल असा एकूण एक लाख ४०हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याकडून चार गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली धुमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल घोडके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, सहायक पोलीस फौजदार दिनेश शिंदे, नामदेव खिलारे, पोलीस अंमलदार बालाजी घोडके, संदीप जढर, विशाल गाडे, अझरुद्दीन पठाण, संदीपकुमार गर्जे, रवींद्र कांबळे, नीतेश टपके, संदीप पाडवी, विठ्ठल वीर, श्यामसुंदर प्रधान, अशोक घाटशिळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.