कोंढवा पोलिसांची कारवाई : बोपदेव घाटातील टेबल स्पॉटवर पकडले
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. कोंढवा पोलिसांनी ही कारवाई बोपदेव घाटातील टेबल स्पॉटवर केली.
प्रसाद उर्फ सोन्या मारुती साबळे (वय २०, रा. प्रगती सी–12 घरकुल, चिखली, चिंचवड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत दुचाकी आणि घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार गणेश चिंचकर व तुषार आल्हाट यांना बोपदेव घाटातील टेबल स्पॉटवर एक जण थांबला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल, प्लास्टिकच्या लहान आकाराच्या डबीत तीन जिवंत काडतुसे सापडली. आरोपी विरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर वाकड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यात तो फरार असल्याची माहिती तपासात समोर आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे गोकुळ राऊत, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार सहायक पोलीस फौजदार असगरअली सय्यद, पोलीस हवालदार योगेश कुंभार, अमोल हिरवे, तुषार आल्हाट, दिपक जडे, अभिजीत रत्नपारखी, महेश राठोड, जयदेव भोसले यांच्या पथकाने केली.
