सहकारनगर पोलिसांची कारवाई : मूळगावी बिहारमध्ये जाण्याअगोदरच मित्राची भेट नडली
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अंगावर पेट्रोल टाकून जाळून खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास १२ तासात सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले. मित्राला भेटून मूळगावी बिहारमध्ये जाण्याअगोदरच के.के. मार्केट येथे मित्राला भेटण्यासाठी येताच पोलिसांनी आरोपीला पकडून अटक केली.
गोविंदा ऊर्फ प्रेमकुमार यादव (वय ३३, रा. खोपडेनगर, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, धनकवडी स्मशानभूमीमध्ये दारू पिण्याच्या किरकोळ कारणावरून सूरज विजय मरळ (वय २८, रा. जीवनधारा, धनकवडी, पुणे) यास पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुन्ह्यातील आरोपी के.के. मार्केट येथील गॅरेजजवळ मित्रास भेटून मूळगावी बिहारमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
अपर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे, पोलीस उपनिरीक्षक बापू खेंगरे, पोलीस अंमलदार बापू खुटवड, सोपान नावडकर, अमोल गुरव, महादेव नाळे, भुजंग इंगळे, प्रदीप बेडिस्कर, सागर सुतकर, प्रवीण कोकणे, शिवाड खेड, मंगेश बोऱ्हाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
