सहकारनगर पोलिसांची कामगिरी : दोन गुन्हे उघड, ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सोनाराची नजर चुकवून अंगठी चोरून नेणाऱ्या दोन तरुणींना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहकारनगर पोलिसांनी अटक केली. ४५ हजार रुपयांची अंगठी आणि २० हजार किमतीची ॲक्टिव्हा असा ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहकारनगर आणि स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे उघडकीस आणले.
तेजल दयानंद मुनेश्वर (वय २०), आणि सुमेधा उल्हास मुनेश्वर (वय २१, दोघी रा. शिवनेरी हाईट्स, आंबेगाव पठार, पुणे) अशी अटक केलेल्या दोघींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोन्याची अंगठी खरेदीच्या बहाण्याने फसवणूक करून पळून गेलेल्या दोन चोरट्या मुलींवर गुन्हा दाखल होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या गुन्ह्यातील आरोपी पुणे-सातारा रस्त्याने कात्रजकडे जाताना दिसल्या. ॲक्टिव्हाच्या गाडी क्रमांकावरून ती गाडी आंबेगाव पठार परिसरातील नारायणी नगरमध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी स.नं. १६ मधील शिवाजी अपार्टमेंटमध्ये गप्पा मारत असताना पकडले. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दुचाकी स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतून हिराबाग येथून चोरल्याचे सांगितले. दोघींना अटक केली असून, ४५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी आणि २० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्वारगेट आणि सहकारनगर पोलीस स्टेशनमधील दोन गुन्हे दोघींकडून उघडकीस आले.
अपर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी बापू खेंगरे, पोलीस अंमलदार बापू खुटवड, महादेव नाळे, भुजंग इंगळे, सागर सुतकर, महेश मंडलिक, प्रदीप बेडिस्कर, महिला पोलीस अंमलदार रेखा यादव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
