प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रूममध्ये एमडी डॉक्टरनेच स्पाय कॅमेरे लावल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावल्याप्रकरणी एका बड्या एमडी डॉक्टरला अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. डॉक्टरनेच हे छुपे कॅमेरे लावल्याचे समोर आल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
दि.06 जुलै रोजी भारती विद्यापीठ कॅम्पस धनकवडी पुणे या ठिकाणी महिला डॉक्टरांच्या राहत्या रूममध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने बनावट चावीच्या सहाय्याने लॉक उघडून व आतमध्ये प्रवेश करून, रूममधील प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ चित्रीकरण करुन त्याचे प्रदर्शन करण्याचे उद्देशाने त्यांच्या बाथरूम व बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याने अज्ञात इसमाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला होता.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणार्या एका महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. पीडिता सकाळी 8:45 वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास रुममध्ये परत आल्यावर तिला बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पीडित महिलेने 6 जुलै रोजी तक्रार नोंदवली होती.
सदर गुन्ह्याच्या अनुषगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपासपथकाचे अधिकारी नितीन शिंदे व त्यांचा स्टाफ यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीचा शोध घेत असताना एका एमडी डॉक्टरवर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणले व त्याचेकडे सखोल तपास केला असता त्यानेच सदरचा छुपा कॅमेरा लावल्याचे कबूल केल्याने त्या दाखल गुन्ह्यात अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास चालू असून, त्यांची दोन दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संगीता यादव या करत आहेत.
सदरची कारवाई ही, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, जगदीश खेडकर, सचिन पवार, सर्फराज देशमुख, हर्षल शिंदे, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड, योगेश सुळ, सचिन गाडे, नीलेश खोमणे, समीर बगशिराज, शिवदत्त गायकवाड, प्रवीण सपकाळ, गणेश सुतार, तुळशीराम टेंभुर्णे, प्रसाद टापरे आणि संतोष खताळ यांनी केली आहे.
कसे बसविले कॅमेरे ?
आरोपीने हे छुपा कॅमेरा असणारा बल्ब ई-कॉमर्स वेबसाइटवरून मागवला असल्याचे समोर आले आहे. आरोपीकडे फिर्यादीच्या घराच्या कुलुपाची बनावट चावी होती. त्या चावीच्या सहाय्याने आरोपीने फिर्यादीच्या घरात प्रवेश करून, छुपे कॅमेरे असणारे बल्ब लावले होते.