बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : ‘गुड टच अॅन्ड बॅड टच’ शिकवताना ऐकविली ‘आपबिती’
महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क
पुणे : ताडीवाला रोड येथे राहणार्या एका इंग्लिश मिडियम स्कुलमधील ११ वर्षाच्या मुलीवर तिचे वडील, अल्पवयीन भाऊ इतकेच नाही तर आजोबा, चुलत मामा यांनी सातत्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१७ ते मे २०२१ दरम्यान बिहार आणि ताडीवाला रोड येथे घडला.
याप्रकरणी २९ वर्षाच्या एका समुपदेशक महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पिडित मुलीचे वडील (वय ४५), भाऊ (वय १४), आजोबा, चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कोरेगाव पार्कमधील एका शाळेत ही ११ वर्षाची मुलगी शिकत आहे. समुपदेशक महिला शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशन करुन त्यांना गुड टच, बॅड टच विषयी समजावून सांगत होत्या. त्यावेळी या मुलीने आपल्यावर गेल्या चार वर्षापासून झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. ही मुलगी २०१७ मध्ये बिहारमध्ये असताना तिच्या वडीलांनी घरात कोणीही नसताना तिच्यावर जबरदस्तीने संबंध करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये ही ताडीवाला रोड येथे असताना तिच्या १४ वर्षाच्या मोठ्या भावाने तिच्याबरोबर बर्याच वेळा जबरदस्तीने शारीरीक संबंध करुन धमकी दिली. जानेवारी २०२१ मध्ये तिच्या आजोबांनी तिच्याशी गैरवर्तन केले तर मे २०२१ मध्ये तिच्या चुलत मामाने तिच्याबरोबर गैरवर्तन केले आहे. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे तपास करीत आहेत.














