भारती विद्यापीठ पोलिसांकडून चौघांवर गुन्हा : कात्रज-कोंढवा रोडवरील पेट्रोल पंपावर घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पेट्रोल भरण्यासाठी रांग लागली असताना ती मोडून पुढे आलेल्यास रांगेत येण्यास सांगितल्याने मोटारसायकल चालकाने साथीदारांना बोलावून पेट्रोल पंपावर धुडगुस घातला. ही घटना कात्रज – कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथील एम. के. खान पेट्रोल पंपावर बुधवारी रात्री १० वाजता घडली.
याप्रकरणी संतोष शिवशरण यरगळ (वय ३९, रा. गोकुळनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीचालकासह ४ ते ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, संतोष यरगळ हे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करीत होते. दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी अनेक जण रांगेत थांबले असताना दोन दुचाकीवरील चार जण रांग मोडून पुढे आले व आमच्या गाडीत आधी पेट्रोल टाका असे म्हणाले.
त्यावरुन पेट्रोल पंपावर काम करणारे मोहित सोडारी याने त्यांना रांगेत येण्यास सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने काही वेळाने दोन मोटारसायकलवरील चौघांनी इतर साथीदारांना बोलवून आणले. त्यांनी संतोष यरगळ, मोहित सोडारी व पेट्रोल पंपावरील मॅनेजर सलीम शेख यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करुन जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक घावटे अधिक तपास करीत आहेत.














