हडपसर पोलिसांत फिर्याद : ससाणेनगरमधील पुरोहित स्वीटमार्टसमोर झाली चोरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : महिलेच्या हातातील दोन लाख तीन हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग चोरून नेणाऱ्या चोरट्यावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ससाणेनगर येथील पुरोहित स्वीट मार्टसमोर ३० मार्च २०२२ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही चोरीची घटना घडली.
सुनिता प्रशांत गावडे (वय ५२, रा. साई कॉलनी, वाडकरमळा, बसथांबा, महंमदवाडी रोड, सय्यदनगर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हडपसरमधील सय्यदनगरमध्ये पुरोहित स्वीट मार्ट येथे उभ्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी फिर्यादीच्या हातातील बॅग हिसकावून नेली. त्या बॅगमध्ये नोटबुक, पतसंस्थेचा अकाऊंट पे चेक, पोस्टाच्या आर.डी.चा अकाउंट पे चेक व रोख दोन लाख तीन हजार रुपये होते. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे पुढील तपास करीत आहेत.
हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके यांनी घटनास्थली भेट दिली.
