विमाननगर पोलिसांत फिर्याद : व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वडिलांच्या मित्रानेच दाखवलं काम
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वडिलांच्या मित्राबरोबर असलेल्या प्रेमसंबंधातून त्याने साथीदाराच्या मदतीने शरीरसंबंधाचा व्हीडिओ काढला तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने रो हाऊस जबरदस्तीने विकायला भाग पाडला. त्याचे आलेले पैसे हडप करुन महिलेचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण करण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१२ पासून सुरु होता.
याप्रकरणी फुलेनगर येथे राहणार्या एका ४० वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पुरुषोत्तम लाल बुटाणी (रा. खेसेपार्क, लोहगाव), वासुदेव पाटील (रा. खेसेपार्क, लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पुरुषोत्तम बुटाणी हा फिर्यादी यांच्या वडिलांचा मित्र असून त्याचे व फिर्यादी यांचे २०१२ पासून प्रेमसंबंध आहेत. त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. बुटाणी याने फिर्यादी यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांच्या बरोबर शरीरसंबंध निर्माण केले. वासुदेव पाटील याने या दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दोघांनी फिर्यादी यांच्या नावावर असलेली रो हाऊसची मालमत्ता विकण्यास जबरदस्तीने भाग पाडले. ती विकून आलेले पैसे फिर्यादीस न देता त्यांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जोगन तपास करीत आहेत.
