कोंढवा पोलिसांत फिर्याद : कामाचे बिल स्वीकारण्यावरुन ठोसा मारून केले जखमी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बांधकाम साईटवर कामाचे बिल स्वीकारण्यावरुन सीव्हिल इंजिनिअरला ठोसा मारून दात पाडणाऱ्या ठेकेदार आणि त्याच्या मुलावर कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा बुद्रुक येथील प्रकृती पॅलॅडियम बांधकाम साईटच्या ऑफिससमोर मंगळवारी (दि.29) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
सचिन रामलाल कुंकुलोळ (वय ५१, रा. हनुमान मंदिरासमोर, उरुळी कांचन गाव, ता. हवेली) असे जखमी झालेल्या सिव्हिल इंजिनियरचे नाव आहे. त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार ठेकेदार विद्यासागर चौधरी (वय ५०) आणि त्यांचा मुलगा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कोंढवा येथील पुण्यधाम आश्रमरोडवर प्रकृती पॅलॅडियम बांधकाम साईट असून, या ठिकाणी फिर्यादी हे सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करतात. मंगळवारी दुपारी फिर्यादी हे बांधकाम साईटच्या कार्यालयासमोर उभे होते. त्यावेळी आरोपी त्यांच्याजवळ आले. त्यांनी बांधकाम साईडच्या स्लाइडींग खिडक्यांच्या केलेल्या कामाचे बिल फिर्यादी यांच्याकडे दिले. मात्र, फिर्यादी यांनी कंपनी मालकाला विचारुन बिल स्विकारतो असे सांगितले. यावरुन ठेकेदार आणि त्याच्या मुलाने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच, फिर्यादी यांच्या तोंडावर ठोसा मारला. यामध्ये त्यांचे दोन दात पडले. तसेच आरोपींनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.
