भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांची कामगिरी : दोघे भाऊ ताब्यात
पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
एका कारसह सुमारे तीन लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा पकडण्यात भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांना यश आले आहे. पोलीस नाईक विशाल वसंतराव खटावकर यांनी वडगाव-कात्रज बायपास रोडवर कारसह हा माल जप्त केला असून, याप्रकरणी दोघा भावांना ताब्यात घेतले आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवार दि. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास वडगाव कात्रज बायपास रोडवर (डी मार्ट समोर, आंबेगाव खुर्द, पुणे) येथे संशयावरून एक पांढरी कार पकडली असता त्यात एकूण रु.2,98,.280/- चा तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा माल विक्रीसाठी घेऊन जात असताना पकडण्यात आला. या मध्ये प्रशांत हरिदास पिसे (वय 25) आणि सौरभ हरिदास पिसे (वय 21), (दोघेही रा. महादेवनगर, भोसरी, पुणे) यांच्यासह चार लाख रुपये किमतीची एक पांढरी स्विफ्ट कार असा एकूण 6,98,.280 रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. दोघे आरोपी सदर कारमधून प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ- याच्या सेवनाने आरोग्याच्या दृष्टीने घातक तसेच मुखाचे कर्करोग व इतर विकार होऊन शारीरिक हानी होते, हे माहीत असतानाही सदर माल विक्रीसाठी घेऊन जात असताना मिळून आलेला असल्याने तक्रार दिल्याने दोघांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारती विद्यापीठ वाहतूक विभागांच्या पोलिसांनी यापूर्वी देखील गुटखा पकडून भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.या कारवाई मुळे भागातील वाहतूक सुरळीत ठेऊन आपले ईतरही कामे चोख बजावणार्या भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
