खंडणीविरोधी युनिट-२ची कारवाई : प्रतिमहा १० टक्के दराने व्याजाची केली मागणी
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
दहा टक्के दराने प्रतिमहिना व्याज वसूल करून दोन लाख ५० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सावकारासह साथीदारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ने जेरबंद केले. त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
सावकार ज्ञानेश्वर किसन पवार (वय ४२, रा. वैदूवाडी, हडपसर) आणि साथीदार ओंकार संदीप तिवारी (वय २३, शिवनगरी, कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याप्रकरणी ओमप्रकाश बुधाई गुप्ता (रा. वडगाव-धायरी, पुणे यांनी खंडणीविरोधी पथक-२कडे फिर्याद दिली होती.
पोलिसांनी सांगितले की, परप्रांतीय कामगार ओमप्रकाश गुप्ता रोजंदारीने घरांना पीओपी बनवून देण्याचे काम करतात. पैशाची गरज भासल्याने त्यांनी सावकार ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून व्याजाने एक लाख ९५ हजार रुपये घेतले. सावकाराने १०टक्के प्रतिमहा जुलमी पद्धतीने आतापर्यंत चार लाख ४५ हजार रुपये घेतले. त्यानंतरही दमदाटी करून अडीच लाख रुपयांची मागणी केली.
आरोपीने तक्रारदाराच्या त्रासाला कंटाळून खंडणीविरोधी युनिट-२कडे तक्रार दिली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास करून आरोपींना अडीच लाख रुपये घेताना रंगेहात पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या पथकाने पकडून अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथक-२चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार संपत अवचरे, प्रदीप शितोळे, विजय गुरव, सैदोबा भोजराव, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, विनोद साळुंके, सचिन अहिवळे, अमोल पिलाणे, संग्राम शिनगारे, राहुल उत्तरकर, प्रवीण पडवळ, प्रदीप गाडे, मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, रुपाली कर्णवर व आशा कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
