जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख : वाहतूक नियम जनजागृती प्रबोधन कार्यक्रम
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
आपले मन व्यवस्थित असेल तर वाहन व्यवस्थित राहील. डोळे-कान दोन्ही इंद्रियांचा योग्य वापर करून वाहन चालविले तर अपघात होणार नाहीत. लहान मुले उद्याची वाहनचालक आहेत, त्यांच्यावर पालकांनी चांगले संस्कार करण्याची गरज आहे. महिलांनी स्वसंरक्षणाविषयी स्वतः दक्षता घेतली पाहिजे, असे मत जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी व्यक्त केले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियम जनजागृती प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश व अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे संजय देशमुख, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मोटार वाहन कोर्ट श्रीमती एस. एस. पारखी, न्यायाधीश व सचिव जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे प्रताप सावंत व पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, डॉन बॉस्को स्कूल व्यवस्थापक मायकल बनसोडे, तसेच वाहतूक शाखेचे प्रभागी अधिकारी, अंमलदार, रिक्षाचालक, वाहनचालक नागरिक उपस्थित होते.
वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी शहरातील लोकसंख्या आणि वाहनसंख्या, तसेच मागील वर्ष व चालू वर्षामध्ये प्राणांतिक अपघाताची माहिती दिली. अपघातांमुळे अपघातग्रस्तांची म्हणजेच पर्यायाने देशाचे नुकसान होत असते. वाहतूक शाखेकडून नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्याकरिता प्रबोधनवर कार्यक्रम राबविल पाहिजेत, असे त्यांन सांगितले.
दरम्यान, एस. एस. पारखी म्हणाल्या की, आपण स्वतंत्र देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरी करीत आहोत. आजही नागरिकांना नियम पाळण्याबाबत सांगावे लागते. सुजाण नागरिक व्हायचे असेल तर वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. नागरिक कायद्यात राहिले, तर फायदात राहतील, या हॅशटॅगप्रमाणे सुजाण नागरिक झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
प्रताप सावत म्हणाले की, कोरोना महामारीमध्ये मृत्यू झाले, त्यापेक्षा जास्त नागरिक अपघातामध्ये मृत्युमुखी पडत आहेत. अल्पवयीन मुलांवर वाहन चालविण्याबाबत नातेवाइकांचे नियंत्रण असणे, वाहन चालविताना नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.















