सोलापूरमधील (बेगमपूर) येथील घटना : एलईडी टीव्ही व मोबाईलसह ७५ हजारांचा ऐवज जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर ग्रामीण एलसीबीच्या पथकाने घरफोडीतील एका आरोपीसह एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून एलईडी टीव्ही व मोबाईलसह ७५ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला. बेगमपूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे १६ ऑगस्ट रोजी ही चोरीची घटना घडली होती.
श्री समर्थ इलेक्ट्रॉनिक दुकानाचे शटर उचकटून एलईडी टीव्ही, मोबाईल असा ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद संजय बब्रुवान जाधव (रा. बेगमपूर, ता. मोहळ) यांनी कामती पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा आढावा घेऊन सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.
तपास सुरू असताना अर्धनारी (ता. मोहोळ) येथील इसमांनी चोरी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली, त्यानुसार बेगमपूर (ता. मोहोळ) येथे जाऊन एका आरोपीसह एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन तपास केला. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचा एलईडी टीव्ही, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकून ७५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, सहायक फौजदार श्रीकांत गायकवाड, पोलीस हवालदार सलीम बागवान, पोलीस अंमलदार लालसिंग राठोड, अजय वाघमारे, राहुल सुरवसे यांच्या पथकाने केली.















