रिक्षातील सहप्रवासी जखमी : कात्रज-मांगडेवाडीत साडेतीनच्या सुमारास घडली घटना
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीची धडक रिक्षाला बसून झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज परिसरातील मांगडेवाडी येथील पेट्रोल पंपासमोर गुरुवारी (दि.26) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.
आशिष तानाजी खवले (वय 32, रा. मुपो. वेळु ता. भोर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषिकेश तानाजी खवले (वय-26) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिन्मय नितीन पजई (वय-25 रा. फ्लॅट नं. 12 वैष्णवी अपार्टमेंट, मोदी गणपतीजवळ, नारायण पेठ) याच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात दुचाकीस्वारासह रिक्षातील सहप्रवासी जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खवले यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून, भोर तालुक्यातील वेळू गावातून ते मार्केटयार्डातील घाऊक बाजारात भाजी विक्रीस पाठवितात. गुरुवारी पहाटे आशिष, ऋषीकेश आणि मित्र सागर पहाटे साडेतीनच्या सुमारास रिक्षातून भाजीपाला घेऊन मार्केटयार्डात निघाले होते. त्यावेळी कात्रज घाट उतरल्यानंतर मांगडेवाडी परिसरात समोरुन भरधाव वेगाने आलेला दुचाकीस्वार रिक्षावर आदळला. अपघातात रिक्षाचालक आशिष खवले, ऋषीकेश, मित्र सागर जखमी झाले तसेच दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. पोलिसांनी चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारपूर्वीच रिक्षाचालक आशिष खवलेचा मृत्यू झाला. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.
