लोहियानगरमधील घटना : खडक पोलिसांकडून फरारींचा तपास सुरू
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क़
रागाने पाहिल्याच्या कारणावरुन दोन तरुणांवर चार जणांनी मिळून कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील लोहियानगर येथील सार्वजनीक रोडवर घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) रात्री साडेबाराच्या सुमारास लोहियानगर येथील श्रीनाथ दूध डेअरी समोर घडली. खडक पोलिसांनी या गुन्ह्यात दोन जणांना अटक केली आहे. तर त्यांचे दोन साथिदार फरार झाले आहेत.
जुबेर उर्फ वडी मुश्ताक शेख आणि आकीब शेख अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून, त्यांचे साथिदार जिया अशरफ शेख (सर्व रा. लोहियानगर) आणि जैद शेख हे फरार झाले आहेत. याप्रकरणी फैजान मोहम्मद गौस शेख (वय-23 रा. मिठा नगर, गल्ली नं.7, कोंढवा) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार आरोपींवर 307,323,504 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि त्यांचा मित्र सलमान हे श्रीनाथ दूध डेअरीसमोरील सार्वजनीक रोडवर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी जुबेर याने फिर्यादी फैजान याच्याकडे रागाने पाहिले. त्यावेळी तू माझ्याकडे रागाने का बघतोस अशी विचारणा फिर्यादी यांनी केली. यानंतर आरोपी जुबेर हा आपल्या साथिदारांसह त्या ठिकाणी आला. ‘आज तेरा और सलमान का हिसाब खत्म करता हूं’ असे म्हणत फिर्यादी आणि त्यांच्या मित्रावर कोयत्याने वार केले. दरम्यान, आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राच्या डोक्यात व हातावर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच जुबेर शेख याने हातातील कोयता हवेत फिरवून मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. जखमी फैजान शेख याच्या फिर्यादीवरुन खडक पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
पुढील तपास खडक पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव करीत आहेत.
