वाघोलीतील घटना : टोळक्याकडून तरुणाला कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
‘तू गट्ट्या आव्हाळेला नडतोस काय तुला खल्लासच करुन टाकतो’, असे म्हणून सराईत गुन्हेगाराने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
सराईत गुन्हेगार शैलेश उत्तरेश्वर बिडवे (रा. वाघोली) आणि किशोर ऊर्फ आचारी चंद्रकांत व्हडले (रा. खांदवेनगर, ता. हवेली) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी अक्षय अनिल कवडे (वय २५, रा. कवडे वस्ती, वाघोली) याने लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष ऊर्फ गट्ट्या आव्हाळे (रा. आव्हाळवाडी, ता. हवेली) याच्यावर गुन्हा लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, अक्षय हा त्यांच्या मित्रांसोबत वाघोलीतील माया हॉटेलच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात २४ ऑगस्टला रात्री ११ वाजता गप्पा मारत थांबला होता. यावेळी तिघे जण तेथे आले. त्यांनी गट्टया आव्हाळेला नडतोस काय? तुला खल्लासच करुन टाकतो, असे म्हणून गट्ट्या व किशोर याने कोयत्याने अक्षय याच्या डोक्यावर, दोन्ही हातावर वार केले. शैलेश याने अक्षय याला सोडू नका असे म्हणत त्याच्याजवळील कोयतेने वार करुन अक्षय याला गंभीर जखमी केले. त्यांच्याजवळील कोयते हातात धरुन हात वर करुन मोठ मोठ्याने आरडाओरडा करीत दहशत निर्माण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक गोरे अधिक तपास करीत आहेत.
