कोंढवा पोलीस स्टेशनची कारवाई : खंडणी, फसवणुक, दंगा अशा गुन्ह्यात सहभाग
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
खंडणी, फसवणुक, दंगा अशा प्रकारच्या विविध गुन्ह्यांत सहभागी असलेल्या अट्टल गुन्हे करणाऱ्या महिलेवर कोंढवा पोलीस स्टेशनने कारवाई करत तिची एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्धता केली आहे.
रेश्मा बापू भालशंकर (वय ४५, सध्या रा. आंबेडकर वस्ती, अंतुलेनगर, येवलेवाडी, पुणे व भीमनगर वसाहत, कोंढवा खुर्द पुणे) असे या अभिलेखावरील सराईत गुन्हे करणार्या महिलेचे नाव आहे. तिने तिच्या साथीदारांसह कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गरीब व गरजू लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन खंडणी, फसवणूक, घराविषयक आगळीक, दंगा यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.
मागील तीन वर्षांमध्ये तिच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत. तिच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परीसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. ती सदर लोंकाना सरकारी जमीन कोणत्याही सरकारी दस्तऐवजाशिवाय विक्री करुन स्वतःचा आर्थिक फायदा करण्याच्या उद्देशाने लोकांची फसवणूक करीत होती आणि वेळप्रसंगी त्यांना दमदाटी व शिवीगाळ करण्यास मागेपुढे पाहत नव्हती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी एमपीडीए कायदयान्वये नमूद महिलेस स्थानबद्ध करण्याकामी प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करून नमूद महिलेविरुध्द २७ ऑगस्ट रोजी एमपीडीए कायदयान्वये एक वर्षाकरिता स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले आहेत.
पोलीस आयुक्तांचे सक्त कारवाईचे धोरण
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सक्रिय व दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहेत. त्यानुसार मागील ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये ३५ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबद्ध केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी या प्रमाणे कारवाई करण्याचे ठरविले आहे.
