पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पीएमपी बसचा धक्का सायकलला लागल्याने ती दुभाजकावर आदळून अपघात झाला. त्यामध्ये 16 वर्षीय सायकलस्वार मुलगी गंभीर जखमी झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना मुलीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी मॉडेल कॉलनीतील दीप बंगला चौकाजवळ घडली.
चंदा परमार (वय 16, रा. थोरवे चौक, दीप बंगला चौकाजवळ, मॉडेल कॉलनी) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, चंदा सायकलवरून शनिवारी दुपारी एक वाजता दीप बंगला चौकाजवळच्या थोरवे चौकातून डिएसके शो रूमसमोरील रस्त्याने जात होती. त्यावेळी गोखले नगर- पुणे स्टेशन या मार्गावरील बस शिवाजीनगरच्या दिशेने येत होती. त्यावेळी चंदाला बसच्यामधील भागाचा धक्का बसल्याने ती दुभाजकावर आदळली. त्यावेळी तिच्या कमरेला जबर दुखापत झाली.
गंभीर अवस्थेतच तिला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथून तिला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविले. मात्र, ससून रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सायंकाळी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे यांनी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
