युनिट-५ची कारवाई : एक लाखाचा मुद्देमाल जप्त
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
शहरामध्ये पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या युनिट-५ने जेरबंद केले. त्यांच्याकडून एक लाख 15 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रमेश नागेश माने (वय-१९ रा. विद्याविहार कॉलनी, डी. पी. रोड, माळवाडी, हडपसर, मूळ रा. आळंब, कर्नाटक), विनोदकुमार केसकुमार वर्मा (वय २१, रा. कौसरबाग, कोंढवा, मूळ रा. धनुबा, जि. चित्रपुर, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखा युनिट-५चे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गुरुवारी (दि.२) हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अमंलदार विनोद शिवले व अकबर शेख यांना दुचाकीवर मोबाईल चोरी करुन त्याची विक्री करण्यासाठी एकजण महादेवनगरमधील ए.एम. कॉलेजजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रमेश माने याला अटक केली. दरम्यान, शुक्रवारी (दि.3) पोलीस अंमलदार आश्रुबा मोराळे व चेतन चव्हाण यांना कोंढवा येथील एका कॅफेमधील काऊन्टवरुन मोबाईलची चोरी करुन चोरीचा मोबाईल खडी मशिन चौकात विक्रिसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी विनोदकुमार वर्मा याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी हडपसर, वानवडी, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे (अतिरिक्त कार्यभार) भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-५चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, आश्रुबा मोराळे, चेतन चव्हाण, विनोद शिवले, अकबर शेख, महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर, प्रविण काळभोर, पृथ्वीराज पांडोळे, अजय गायकवाड, संजयकुमार दळवी, दिपक लांडगे, दाऊद सय्यद, विशाल भिलारे, अमर उगले, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
