पिंपरीतील दरोडा विरोधी पथकाची कारवाई : साडेचार लाखाचा ऐवज जप्त
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
मौजमजेसाठी दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या चौघांना पोलिसांनी २४ तासांत जेरबंद केले असून, दोघे अद्याप फरार आहेत. आरोपींकडून रोख रक्कम, पिस्टल, मोबाईल, दोन दुचाकीसह साडेचार लाखांचा ऐवज जप्त केला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.
यश गणेश आगवणे (वय १९, त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे, पुणे), कासीम मौला मुर्शीद (वय २१, पुण्य हौसिंग सोसायटी, ओटा स्कीम, निगडी, पुणे), सागर आदिनाथ पवार (वय १८, रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, आझाद चौक, ओटी स्कीम, निगडी, पुणे), कंपनीचा ड्रायव्हर अभिषेक शिरसाट अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी साई स्टील ट्रेडर्स प्रा. लि.चे मालक भीमसेन वर्दीसिंग राजपूत यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवडमधील (वाल्हेकरवाडी) साई स्टील ट्रेडर्स प्रा. लि. कंपनीचे मालक ड्रायव्हरसह कामगारांचे पेमेंट घेऊन जात असताना दुचाकीवरील पाचजणांनी अडवून मारहाण करून पिस्टलचा धाक दाखवित सात लाख ३ हजार ६५० रुपये रोकड चोरून नेली होती. गुन्हे शाखेकडून त्याचा सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळाची पाहणी करून सूत्रांच्या माहितीआधारे दुचाकीवरील चोरट्यांचा तपास सुरू केला.
संशयित आरोपी चिखलीतील हुमा बेकरीच्या पार्किंगमध्ये थांबल्याची माहिती मिळाली, त्यानुसार घटनास्थळी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी यश आगवणे याच्याकडून ५० हजार रुपये रोख व मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल, ॲक्टिवा मोपेड अशी एकूण मिळून चार लाख ४५ हजार रोख रक्कम, एक लोखंडी गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल), तीन मोबाईल फोन व दोन मोटारसायकली मिळून आल्या. तिन्ही साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची त्याने कबुली दिली.
दरम्यान, कंपनीचा ड्रायव्हर अभिषेक शिरसाट व गुन्ह्यातील आरोपी एकमेकाच्या परिचयाचे असून, अटक व फरारी आरोपीवर उसनवारीचे कर्ज होते. तसेच, मौजमजा करण्यासाठी कंपनीचे पैसे लुटण्याचा त्यांनी कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. शिरसाट यानेच आरोपींना माहिती दिली होती, लुटलेल्या पैशातील जास्तीचा हिस्सा शिरसाट याला देण्याचे ठरले होते. लुटमार करताना मला जास्त मारू नका, मी नंतर तक्रार देण्यास जाईल, असेही आरोपीला त्याने सांगितले होते. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर शिरसाट पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आला होता. त्यावेळेपासून पोलिसांनी त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून दरोडाविरोधी पथकाने समांतर तपास सुरू केला.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडाविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश बांगे, पोलीस अंमलदार आशिष बनकर, नितीन लोखंडे, महेश खांडे, राहुल खारगे, उमेश पुलगम, राजेंद्र शिंदे, विक्रांत गायकवाड, गणेश कोकणे, प्रवीण कांबळे, प्रवीण माने, सागर सेडगे, राजेश कोशल्ये, औंदुंबर रोंगे व तांत्रिक विश्लेषन विभागाचे नागेश माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
