दारूच्या दुष्परिणामांविरोधात अभियान : दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंकडून दारूच्या दुष्परिणामांविरोधातील अभियानांतर्गत अवैध हातभट्टीविरोधात ‘ऑपरेशन परिवर्तन’ सुरू करण्यात आले असून यात एकूण अकरा जणांना ताब्यात घेऊन येऊन एकूण दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चोरून हातभट्टीची निर्मिती होत असून, तिची विक्रीदेखील होत आहे. दारूमुळे गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत असून वेळप्रसंगी काही लोकांना प्राणासदेखील मुकावे लागते. यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात ‘ऑपरेशन परीवर्तन’ हे अभियान सुरू केले आहे. यामध्ये सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील हातभट्टी निर्मिती व विक्री करणारे एकूण ७१ ठिकाणे (Hotspot) निश्चित करण्यात आली असून, सदर ठिकाणे ही पोलीस अधीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांना दत्तक म्हणून देण्यात आलेली आहेत.
यामध्ये पालक अधिकारी यांनी सदर गावातील ठिकाणीवरील अवैध दारू निर्मीती व विक्री बंद करणे, सदर व्यवसायातील लोकांना परावृत्त करणे, त्यांना दुसऱ्या कायदेशीर उद्योगाकडे वळवणे, त्यासाठी कर्ज/ शासकीय मदत मिळण्यसाठी मार्गदर्शन करणे, अशा कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी यामध्ये मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) आणि अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी भानुदास तांडा (ता. दक्षिण सोलापूर) हे तांडे दत्तक घेतले असून, त्या योजनेमध्ये दोन्ही अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक घेऊन दोन्ही तांड्यांवरील अवैध हातभट्टी निर्मिती करणाऱ्या ठिकाणी छापे घातले आहेत. त्यामध्ये पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
आजपर्यंतच्या कारवाईत एकूण अकरा केसेसमधून ३७५० रुपयांची १५० लिटर दारू आणि १०,१२,२०० रुपयांची एकूण ४८२०० लिटर रसायने असा एकूण किंमत १०,१५,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन एकूण ११ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुळेगाव तांडा येथे छापा टाकल्यानंतर गावातील तरुण मुलांनादेखील तेजस्वी सातपुते यांनी हातभट्टी दारूमुळे होणारे दुष्परीणाम व त्यापासून परावृत होण्यासाठी मार्गदर्शन केले. यामध्ये सदर गावातील राज चव्हाण या इसमाने स्वतःची दारूची भट्टी स्वतः जेसीबी मशिनने नष्ट केली असून, यापुढे हातभट्टीची दारू गाळणार नसल्याचे सर्वासमक्ष जाहीर केले.
सोलापूर ग्रामीण जिल्हयातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील अशा ठिकाणी सर्व पोलीस अधीकाऱ्यांनी कारवाई केली असून, सर्वत्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुळेगाव व भानुदास तांडा येथील कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, अरुण फुगे, राखीव पोलीस निरीक्षक काजुळकर, पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण व इतर अधिकारी व अंमलदार यांनी भाग घेतला होता.
