येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : काम करण्याच्या बहाण्याने घराची पाहणी करून डाव साधला
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
कल्याणीनगरमध्ये वृद्ध महिलेने मुलगा-मुलगी परदेशी असल्याने घरकामासाठी मोलकरीन ठेवली. संबंधित महिलेने पूर्ण नाव, पत्ता आणि ओळखीचा पुरावा दिला नाही. दोन दिवस थोडा वेळ काम करण्याच्या बहाण्याने पाहणी करून रोख चार हजार रुपये आणि सुमारे आठ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. ही घटना कल्याणीनगरमधील इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये २९ जून २०२१ रोजी घडली.
याप्रकरणी नीता थवानी (वय ७३, रा. कल्याणीनगर, पुणे) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार घरकाम करण्यासाठी आलेल्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी नीता थवानी एकट्याच घरात राहतात. मुलगा-मुलगी परदेशात राहतात. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी महिलेला कामाला ठेवली. दोन दिवस साहित्य आणण्याच्या बहाण्याने लवकर जात होती. दरम्यान, दोन दिवसांत तिने घरामध्ये कोण येते किंवा नाही, तसेच आसपासची पाहणी करून तिने घरातील चार हजार रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण आठ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. घरकाम करण्यासाठी आलेल्या महिलेने कोणताही ओळखीचा पुरावा आणि पूर्ण नाव, पत्ता दिला नसल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील करीत आहे.
