स्पेशल सेल विशेष शाखा पुणे शहरची कामगिरी : कर्नाटकात जाऊन घेतले ताब्यात
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
मोक्का गुन्ह्यातील चार महिन्यांपासून फरारी आरोपीस स्पेशल सेल विशेष शाखा पुणे शहरकडून कर्नाटकात जाऊन विजापूरमधून अटक केली असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास जय तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे या ठिकाणी आरोपी नामे अवतारसिंग कर्तारसिंग टाक, जपानसिंग कर्तारसिंग टाक, सोरनसिंग कर्तारसिंग टाक, तुफानसिंग कर्तारसिंग टाक (चौघेही रा. तुळजाभवानी वसाहत, कॅनॉललगत, हडपसर, पुणे) आणि ओंकारसिंग कर्तारसिंग टाक (रा. महात्मा फुले वसाहत, गाडीतळ, हडपसर पुणे) यांनी फिर्यादी (रा. हडपसर पुणे) यांना, त्यांच्या घराजवळील वीट व वाळू सप्लाय दुकानाची जागा खाली करून दे, अगर दोन लाख रूपये दे, असे सांगितले. त्यास फिर्यादी यांनी नकार दिल्याने वरील आरोपींनी फिर्यादी याचेवर डोक्यावर तलवारीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे प्राथमिक तपासात आरोपींनी संघटितपणे गुन्हे केल्याचे दिसून आल्याने सदर गुन्ह्याचा समावेश मौक्काअंतर्गत करण्यात आला होता.
वरील गुन्ह्यात अवतारसिंग कर्तारसिंग टाक, जपानसिंग कर्तारसिंग टाक आणि सोरनसिंग कर्तारसिंग टाक यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. परंतु ओंकारसिंग कर्तारसिंग टाक (रा. महात्मा फुले वसाहत, गाडीतळ हडपसर पुणे) आणि तुफानसिंग कर्तारसिंग टाक (वय ३२, वर्ष रा. तुळजाभवानी वसाहत, कॅनॉललगत हडपसर, पुणे) हे गुन्हा घडल्यानंतर फरारी झाल्याने मोक्का न्यायालयाने त्यांच्याविरुध्द अटक वॉरंट काढले होते. गुन्ह्याचे तपासी अंमलदार सुनील पवार, सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अब्दुलकरीम सय्यद यांचे व पोलीस अंमलदारांचे एक पथक तयार केले होते. तेव्हापासून वरील आरोपींचा शोध पोलीस घेत होते.
गुन्हा घडल्यानंतर आरोपी तुफानसिंग कर्तारसिंग टाक चार महिन्यांपासून मिळून येत नव्हता. सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून, आरोपी तुफानसिंग कर्तारसिंग टाक हा कर्नाटक राज्यातील विजापूर येथे असल्याची त्यांना माहिती मिळाली होती.
त्याप्रमाणे वरील गुन्ह्याचे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अब्दुलकरीम सय्यद, सहायक पोलीस फौजदार अनिल घाडगे, पोलीस हवालदार राजु रणसिंग, पोलीस नाईक सुहास कदम सर्व नेमणूक विशेष शाखा, यांनी विजापूर, कर्नाटक येथे जाऊन आरोपीची माहिती काढून मोक्का गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी तुफानसिंग कर्तारसिंग टाक यास पोलीस उपनिरीक्षक अब्दुलकरीम सय्यद, यांनी अटक करून ताब्यात घेवून पुण्यात घेवून आले. त्यास मोक्का न्यायालयापुढे हजर करण्यात आले असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, सहायक पोलीस आयुक्त, सुनील पवार, विशेष शाखा, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अब्दुलकरीम सय्यद यांनी सह पोलीस फौजदार अनिल घाडगे, विजय भोसले, दिलीप भोंग, दत्तात्रय शेळके, पोलीस हवालदार राजु रणसिंग, पोलीस नाईक सुहास कदम सर्व नेमणुक विशेष शाखा, पुणे यांच्या पथकाने केली. वरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार हे करीत आहेत.















