वानवडी पोलिसांची कामगिरी : कपाटातील ९ हजार ५०० रुपये घेऊन झाली होती फरार
पुणे : महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क
घरकाम करणार्या महिलेने ज्येष्ठ महिला व तिच्या मुलाला जेवणामधून गुंगीचे औषध देऊन कपाटातील रोख रक्कम चोरली. त्यानंतर तिने थेट मूळगावी तामिळनाडूमध्ये पळ काढला होता. मात्र, वानवडी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तामिळनाडूमध्ये जाऊन तिच्या मुसक्या आवळल्या.
शांती चंद्रन (वय ४३, रा. तिरुवअण्णा मलाई, तामिळनाडु) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका ६० वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ८ ऑगस्ट रोजी रात्री १० ते ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्यांच्या सुमारास घडली.
पोलिसांनी सांगितले की, घोरपडीतील सोपानबाग येथील मिटटाऊन सोसायटीत एक ६० वर्षांची महिला आपल्या मुलासह राहते. त्यांच्याकडे शांती चंद्रन ही महिला घरकाम करीत होती. तिने रात्रीच्या जेवणातून फिर्यादी व त्यांच्या मुलाला गुंगीचे औषध दिले होते. त्यांना गुंगी आल्यावर कपाटात ठेवलेले ९ हजार ५०० रुपये चोरुन नेले होते. त्यानंतर ती तामिळनाडुला आपल्या गावी पळून गेली होती. दरम्यान, वानवडी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत तिला अटक केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
