भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : दीड लाखाच्या चोरीच्या सात गाड्या जप्त
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे परिसरासह फलटण-लोणंद परिसरातील मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या सराईत चोरास जेरबंद करण्यात
भारती विद्यापीठ पोलिसांना यश मिळाले असून, आरोपीकडून चोरीच्या दीड लाख रुपये किमतीच्या एकूण सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
२३ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ ते २४ ऑगस्ट रोजी पहाटे सहा वाजताच्या दरम्यान दिगंबर हाईटस, अंजलीनगर, कात्रज, पुणेच्या पार्किंगमध्ये फिर्यादी अजय नथु धरपाळे (वय २७, अंजलीनगर, कात्रज, पुणे) यांनी त्यांची स्प्लेंडर मोटारसायकल लॉक करून पार्क करून ठेवली असता, ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार अभिजित जाधव यांना बातमीदारामार्फत गोपनीय बातमी मिळाली की, वरील गुन्ह्यात चोरीला गेलेली स्प्लेंडर मोटार सायकल घेऊन एक मुलगा गुजरवाडी फाटा येथे ट्रकच्या गॅरेजजवळ थांबलेला आहे. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे व इतर पोलीस स्टाफने सदर इसमास चोरीच्या गाडीसह ताब्यात घेतले. गणेश बाळु ओतारी (वय २३, रा. मु. पो. शिवाजीनगर, ता. खंडाळा जि. सातारा) असे त्याचे नाव असून पोलीस अंमलदार रवीन्द्र भोसले यांनी त्याला सदर वाहनचोरी गुन्ह्यात अटक केले.
सदर गुन्ह्यातील अटक आरोपी हा सराईत वाहनचोर असून त्याच्याकडे आणखी काही गुन्ह्यांची चौकशी केली असता, त्याने आणखी गाड्या चोरी केल्याचकबुल करून सदर गाड्या वापरून त्या विक्री करण्याचे हेतूने लपवून ठेवल्याचे सांगितले. त्याच्याकडून सहा दुचाकी मिळविण्यात आल्या. सदर गाड्या चोरीस गेल्याबाबत भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे, लोणंद पोलीस स्टेशन येथे एक, फलटण पोलीस स्टेशन येथे एक, चतुःशृंगी व कोथरूड पोलीस स्टेशन कडील एक असे ६ गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपीकडून एकूण सात दुचाकी गाड्या जप्त एकूण १,५०,००० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करून सात वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.
सदरची कामगिरी ही, पोलीस उपआयुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंकुश कर्चे व तपास पथकांचे अंमलदार रवीन्द्र भोसले, रवीन्द्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, नीलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, राजू वेगरे, तुळशीराम टेंभुर्णे यांनी केली आहे.
