दोघे जेरबंद : भंगार विक्रेत्यांमध्ये राडा, दोन्ही भंगार विक्रेत्यांवर गुन्हे दाखल
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
आपल्याकडे काही वर्ष काम करीत असलेल्याने स्वत: नवीन दुकान टाकल्यानंतर भावाला मुलगी झाल्याच्या कारणावरुन कामगारांना जेवायला बोलावले. त्या रागातून एका भंगार विक्रेत्याने दुसर्या भंगार विक्रेत्यावर लोखंडी रॉडने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याविरुद्ध परस्पर विरोधात तक्रार दाखल झाली आहे.
याप्रकरणी रमेश कुमार ऊर्फ राजन जीवनलाल आग्राहरी (वय ३२, रा. साईनाथनगर, जुना मुंढवा रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अहमंद महंमद पुरीयल (रा. नागपूर चाळ, येरवडा), जाकीर मोतीलाल तांबोळी (रा. यमुनानगर, विमाननगर) यांच्यावर गुन्हा दाखल करुन तांबोळी याला अटक केली आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथील सोपानगरमधील आग्राहरी स्क्रॅप सेंटरमध्ये सोमवारी सकाळी ११ वाजता घडला.
रमेशकुमार हे पुरीयल यांच्या भंगाराच्या दुकानात १० वर्षे काम करीत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:चे भंगाराचे दुकान सुरु केले. रमेशकुमार यांचा भाऊ अखिलेश याला मुलगी झाल्याने त्याने कामगारांसाठी जेवणाची पार्टी ठेवली होती. त्याला पुरीयल याच्या दुकानातील ८ ते १० कामगारांना जेवायला बोलवले होते. त्याचा राग येऊन पुरीयल व तांबोळी हे त्याच्या दुकानात आले. रमेशकुमार याला शिवीगाळ करुन ”तुम्हे बहुत मस्ती है, तुने मेरे दुकान के कामगार लोगों को क्यो बुलाया” असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन जबर जखमी केले.
अहमंद पुरीयल (रा. शास्त्रीनगर, नागपूर चाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चंदननगर पोलिसांनी रमेशकुमार आग्राहरी, लालु ऊर्फ अखिलेश आग्राहरी, लाला ऊर्फ अवधेश आग्राहरी आणि एका अनोळखी अशा चौघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील लाला आग्राहरी याला अटक केली आहे. पुरीयल याने रमेशकुमार याला ५ लाख रुपये हात उसने दिले आहेत. ते दिलेले पैसे मागण्याकरीता ते व त्यांचा कामगार जाकीर तांबोळी हे आग्राहरी स्क्रॅप सेंटरमध्ये गेले होते. पैशांची मागणी करुन फिर्यादीने रमेशकुमार याला शिवीगाळ करत ”तू माझ्या फेरीवाल्यांना भंगारच्या बाजाराभावाबाबत का फितवतो” अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी याच्या कपाळावर व नाकावर रॉडने मारुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक मिसाळ तपास करीत आहेत.
