वडगाव-मावळ येथील घटना : एक अटकेत, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बनावट गुटखा तयार करणाऱ्या वडगाव-मावळ (जि. पुणे) येथील एका कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी कच्चा माल, यंत्रसामग्री, कार असा एकूण 11 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी श्रीकांत बाळू चांदेकर (वय-32 रा. ढोरे वाडा, वडगाव मावळ) याला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती, साठवण, विक्री व वाहतूक करण्यास बंदी आहे. तरीसुद्धा वडगाव मावळ हद्दीत बनावट गुटखा तयार करुन त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून पाहणी केली असता, बनावट गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, यंत्र सामग्री, चारचाकीसोबत आरोपी श्रीकांत चांदेकरला रंगेहाथ पकडले. पोलिसांनी चांदेकर याला ताब्यात घेतले असून आज (सोमवार) त्याला वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय वडोदे करीत आहेत.
या कारवाईमुळे बनावट गुटखा तयार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
