पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
भाजपचे नगरसेवक व माजी सभागृह नेते धिरज घाटे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास शेफ्रॉन हॉटेल नवी पेठ शास्त्री रोड परिसरात घडली आहे.
विकी उर्फ वितुल क्षिरसागर, मनोज पाटोळे (रा. सानेगुरूजी नगर आंबीलओढा कॉलनी), महेश आगलावे (रा. लोहीयानगर) या तिघांना अटक केली असून, इतर तीन ते चार साथीदारांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी धिरज रामचंद्र घाटे (वय 46, रा. स्नेहनगर वृंदावन, नीलायम टॉकीजवळ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी घाटे शुक्रवारी दुपारी चहा पिण्यासाठी येथील शेफ्रॉन हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांचा जुना कार्यकर्ता विकी क्षीरसागर हादेखील त्यांच्या काही साथीदारांसोबत तेथे आला होता. घाटे यांचे कार्यकर्ते त्याच्याबरोबर संपर्क ठेवत नाहीत, बरोबर जात नाहीत म्हणून तो मागील काही दिवसापासून रागात होता.
दरम्यान आगामी कालावधीत होणार्या महापालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणूकीत त्याचा भाऊ राकेश क्षिरसागर हा सहज निवडून यावा म्हणून चार ते पाच साथीदारांना एकत्र करून घाटे यांच्या खूनाचा कट रचून शेफ्रॉन हॉटेलमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आला होता. याबातची माहिती घाटे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता हा प्रकार समोर आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पाच ते सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही संशियतांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे.

















