खडक पोलीस स्टेशनची कारवाई : चौघे अटकेत, दोघे फरार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ब्लॅक मनी व्हाईट करून देण्याच्या आमिषाने एक कोटी रुपयांना फसवणाऱ्या टोळीस गजाआड करण्यात खडक पोलीस स्टेशनला यश मिळाले असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आले असून, आणखी दोघे फरार आहेत.
खडक पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील फिर्यादींचा स्टेशनरी विक्रीचा होलसेल व्यवसाय आहे. फिर्यादींच्या घराशेजारी राहणारे गणेश हुशार यांनी अटक आरोपी प्रकाश माने याच्या सोबत ओळख करून दिली होती. त्याच ओळखीचा गैरफायदा घेऊन आरोपी प्रकाश माने याने ¨बायजुथिंग अँड लर्न लिमिटेड, कोलकता, पश्चिम बंगाल° ही कपंनी असून त्या कंपनीमध्ये एक कोटी रुपये गुंतविल्यास कंपनी एक कोटी तीस लाख रुपये देते, असे फिर्यादी निखिल कदम यांना सांगून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांचेकडून पानगंटी चौक, शुक्रवार पेठ, शिवाजी रोडजवळ, पुणे या ठिकाणी दिनांक १ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास एक कोटी रुपये रोख स्वरूपात घेऊन, सदर रकमेचा परतावा व मूळ रक्कम न देता फिर्यादी यांची फसवणूक केल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता.
दाखल गुन्ह्याचे संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे तपास करून गुन्ह्यामध्ये आरोपी प्रकाश माने (रा. वरळी, मुंबई), विनोद परदेशी (रा. आदर्शनगर, धनकवडी, पुणे), नयन बारोट (रा. कस्तुरे चौक, पुणे) आणि समीर वझे (रा. गोवा) यांना अटक करून त्यांच्याकडून फसवणूक केलेल्या रकमेबाबत तपास अद्यापी सुरू आहे. गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून त्यांची राज्यीय- आंतरराज्यीय टोळी असल्याची शक्यता असून त्या गुन्ह्यामध्ये अद्यापी दोन आरोपी फरार आहेत. अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रकाश आनंद माने हा मुंबई येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर वरळी, एन. एम जोशी मार्ग, दादर, मुंबई येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक राहुल खंडाळे हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपआयुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्रीहरी बहिरट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल खंडाळे, विक्रम मिसाळ, राहुल घाडगे, पोलीस अंमलदार अजीज बेग, फहिम सैय्यद, संदीप पाटील, रवी लोंखडे, समीर शेख, राहुल मोरे, विशाल जाधव, अर्जुन कुडाळकर, हिम्मत होळकर, कल्याण बोराडे, सागर घाडगे यांच्या पथकाने केली आहे.
