मुरूडमधील काशिद समुद्रातील घटना : जीवरक्षकाच्या सूचनांकडे दुर्लक्ष
महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क
पुणे : जीवरक्षकाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करुन पाण्यात उतरलेल्या दोन पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. मुरुडमधील प्रसिद्ध काशिद समुद्रात बुडून पुण्यातील दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोहायला उतरलेल्या या तरुणांना पाण्याचा अंदाज न अल्याने ही घटना घडली आहे. ही घटना शनिवारी दुपारी 3.15 वाजता काशिद समुद्रात घडली.
लालटू नस्कर (वय-28) व पालटू सुत्रधर (वय-38) अशी बुडालेल्या पर्यटकांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, समुद्रात बुडालेले दोन्ही पर्यटक मूळचे कोलकात्ता येथील असून, पुण्यात ते कामाला होते. काम करीत असलेल्या ठिकाणच्या अन्य सहकारी कर्मचाऱ्यांसह दोन बसमधून हे पर्यटक काशिदला फिरायला आले होते. या पर्यटकांना किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी समुद्रात न उतरण्याच्या सूचना दिल्या होत्या. जीवरक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार एका बसमधील पर्यटक समुद्राच्या पाण्यात उतरले नाहीत. परंतु सूचना करुनही दुसऱ्या बसमधील लालटू नस्कर व पालटू सुत्रधर हे समुद्राच्या पाण्यात उतरले. या दोघांनाही समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. दोघाही पाण्यावर तरंगत असल्याची बाब जीवरक्षक अमोल कासार यांच्या निदर्शनास आली.
तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करत त्यांना पाण्याबाहेर काढत किनाऱ्यावर आणले. परंतु ते बेशुद्धवस्थेत होते. त्यांना तातडीने एटीव्ही बाईक आणि घोडेचाकलांच्या मदतीने तातडीने बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, जीवरक्षक आणि स्थानिक ग्रामस्थांनी सूचना करुनही उत्साहाच्या भरात समुद्रात उतरणे या पर्यटकांच्या जीवावर बेतले आहे.या पर्यटकांनी मद्यपान केले असल्याचे बोलले जात आहे.















