येरवडा आणि स्वारगेटमधील घटना : म्हणत मोबाईल चोरटे पसार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मोटारसायकल थांबवून मोबाईलवर चालक बोलत असताना पाठीमागून मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरला. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ”पीछे नही आने का, नही तो जान से मार डालूंगा” असे म्हणून धमकावून ते पळून गेले. शहरात गेल्या काही दिवसांमध्ये जबरदस्तीने हिसकावून घेणार्या मोबाईल चोरट्यांची दहशत वाढली आहे. रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणाऱ्याची ही मोबाईल चोरी होऊ लागली आहे.
याप्रकरणी माधव नरहरे (वय ६२, रा. आदर्शनगर, वडगाव शेरी) या ज्येष्ठ नागरिकांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ते १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरुन घरी जात होते. गलांडे गार्डनजवळ असताना त्यांना फोन आल्याने ते रोडच्या कडेला मोटारसायकल थांबवून मोबाईलवर बोलत होते. त्यावेळी पाठीमागून दोघे जण मोटारसायकलवरुन आले व त्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना धमकावून ते चोरटे पळून गेले.
दुसरी घटना स्वारगेट येथील मित्र मंडळ चौकातील हॉटेल नैवेद्यमच्या मागील बाजूस १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी विनय जांभळी (वय ५१, रा. दत्तनगर, कात्रज) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ते कट्यावर बसले असता मोबाईल तेथेच विसरुन गेले. हे लक्षात आल्यावर ते पुन्हा तेथे आले़ तर मोबाईल तेथेच होता. त्यांनी मोबाईल हातात घेतल्यानंतर त्यांच्या पाठीमागून चोरटे आले व त्यांनी २३ हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने त्यांच्या हातातून हिसकावून घेतला व त्यांनी पर्वतीच्या दिशेने धूम ठोकली.















