पोलिसांपुढे आव्हान : भल्या सकाळी चोरट्यांकडून दागिने चोरण्याचा सपाटा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात भल्या सकाळी चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारण्याकडे मोर्चा वळविला आहे. रस्त्यावर तुरळक गर्दीचा फायदा घेत दुचाकीवरील चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा सपाटा सुरू केला आहे. दागिने चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हानच उभे राहिले आहे . शहराच्या मध्यवस्तीमध्ये एकाच दिवसात तीन चोरीच्या घटना घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
टिळक रस्ता तसेच सारसबाग परिसरात महिलांच्या दागिन्यावर दुचाकीवरील चोरट्यांनी डल्ला मारला. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार पर्वती गाव परिसरात राहायला आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास त्या दुचाकीवरून टिळक रस्त्याने निघाल्या होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेसमोर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ५० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.
पोलीस उपनिरीक्षक एम. बी. कुरेवाड तपास करत आहेत.
दुसरी घटना सकाळी पावणेसातच्या सुमारास सारसबाग परिसरातील सणस मैदानाजवळ पादचारी ज्येष्ठ महिलेचे ४५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ज्येष्ठ महिला बुधवार पेठ परिसरात राहायला आहेत. मंगळवारी सकाळी त्या सारसबाग परिसरात फिरायला आल्या होत्या. त्यांनी याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तपास करत आहेत.
