कॉलेजमधून घरी येताना घडली घटना : वीज कोसळून मुलीचा मृत्यू
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कॉलेजमधून घरी आलेल्या मुलीच्या अंगावर वीज कोसळून तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भोरदरा (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. डोळ्यासमोर ही घटना घडल्याने वडिलांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मीरा सखाराम लोहकरे (वय-19) असे वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
मंचर पोलीस ठाण्यात मीराचे वडिल सखाराम लिंबाजी लोहकरे यांनी घटनेची माहिती कळवली आहे.
पुणे जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होता. आंबेगाव तालुक्यात देखील सायंकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला होता. मीरा कॉलेज वरून घरी येत होती. मीराचे वडील तिला दुचाकीवरुन घेऊन येत होते. घराजवळ आले असता सखाराम यांनी मीराला खाली उतरुन चिखल बघून चालत ये असे सांगून ते पुढे जात होते. त्याचवेळी मीराच्या अंगावर वीज कोसळली. मीराला तातडीने मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.
