कारचालकाचा मृत्यू : मुंढवा-घोरपडी रस्त्यावर शुक्रवारी पहाटे घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : महानगरपालिकेचा कचरा सफाई करणारा ट्रक रस्त्याच्या कडेची सफाई करत असताना भरधाव वेगातील स्विफ्ट कार पाठीमागून धडकून अपघात झाला. या अपघातामध्ये कारचालकाचा मृत्यू झाला. मुंढवा-घोरपडी रस्त्यावरील कचरे वस्ती सुभाष घई बंगल्याजवळ शुक्रवारी (दि.8) पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
प्रशांत जगन्नाथ भुजबळ (वय-30 रा. सर्वे नं. 103 गांधी नगर, येरवडा, मुळ रा. मु.पो. कोंड, ता. जि. उस्मानाबाद) असे मृत्यू झालेल्या स्विफ्ट कार चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पालिकेचा रस्ता सफाई करणारा ट्रक (एमएच-12-क्यूडब्ल्यू 5210) सुभाष घई बंगल्याच्या समोरील रस्त्यावर सफाई करत पुढे चालला होता. त्यावेळी स्विफ्ट कार (एमएच 12 एऐक्स 3102) ही भरधाव वेगात येऊन ट्रकला पाठीमागून धडकून अपघात झाला. या अपघातात चालक प्रशांत भुजबळ हा गंभीर जखमी झाला. त्याला गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.
अपघात झाला त्यावेळी कचरा ट्रक चालक अमोल कैलास गायकवाड (वय-28 रा. दत्तवाडी पुणे) हा ट्रक चालवत होता. याप्रकरणी प्रशांत भुजबळ याच्या चुकीमुळे अपघात झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन भोसले करीत आहेत.
