फरासखाना पोलिसांत गुन्हा : गणेश पेठ पोलीस चौकीसमोर घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : लक्ष्मी रस्त्यावर मद्यपीच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री पुण्यातील गणेश पेठ पोलीस चौकीसमोर मध्यरात्री घडली आहे. मयत हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
सूरज अनंत कामथे (वय-32 रा. गणेश पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची बहिण स्नेहल काची (वय-33 रा. शुक्रवार पेठ) हिने फरसाखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मयत सुरज कामथे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असून त्याला दारुचे व्यसन आहे. मध्यरात्री एकच्या सुमारे गणेश पेठ पोलीस चौकीसमोर पीएमपी थांब्याजवळ कामथे याच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला. सूरज हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी तात्काळ घनास्थळी धाव घेतली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
सूरज कामथे याचा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी संशयावरुन एकाला ताब्यात घेतले आहे.
फरासखाना पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करीत आहेत.
