वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : जामीनावर सुटलेल्या सराईताने काढली पुण्यात रॅली
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या आणि जामीनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराची पुण्यात रॅली काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील कर्वेनगर परिसरात घडला असून, आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
वैभव उर्फ पप्या उकरे, तुषार जावळकर, सूरज पवार, मयूर पवार, आकाश धोत्रे, मनोज दिघे, अमित नलावडे, विजू मोरे, योगेश पवार, स्वप्नील धोत्रे, सागर धोत्रे, अजय धोत्रे, आशिष माळी, रोहित राठोड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी पोलीस शिपाई विष्णू म्हातारमारे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, वैभव उकरे याच्या विरुद्ध एकाचा खुन करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी कारगृहात केली होती. आरोपीला आज जामीन मंजूर झाल्याने तो कारागृहाबाहेर आला. त्यानंतर तो कर्वेनगरमधील वडार वस्ती परिसरात आला.
उकरे याच्या साथीदारांनी परिसरात दहशत पसरवण्यासाठी हातात तलवार, गज, काठ्या घेऊन दुचाकी रॅली काढली. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उकरे आणि त्याच्या साथिदारांना समज देत असताना त्यांनी पोलिसांना आरेरावीची करत शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच पोलिसांना या प्रकरणात पडू नका असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे.एन. होळकर करीत आहेत.















