पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून चंद्रकांत दरोडे विद्यालयात उपक्रम
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून ‘पुणे शहर पोलीस महिला पथक व रेडिओ वन’ यांच्या सहकार्याने नवरात्रीनिमित्त महिलांसाठी स्वसंरक्षण तंत्र शिकवणाऱ्या ‘शक्ती’ (EXTRA ORDINAARIS OF PUNE) कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. चंद्रकांत दरोडे विद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून ‘पुणे शहर पोलीस महिला पथक व रेडिओ वन’ यांच्या सहकार्याने नवरात्र उत्सव निमित्त महिलांनी स्वतःचे संरक्षण स्वतःच करण्याची शारीरिक व मानसिक ताकद, कौशल्य, आत्मविश्वास निर्माण करून स्वसंरक्षण तंत्र शिकवणारा ‘शक्ती ( EXTRA ORDI NAARIS OF PUNE)’ कार्यक्रम मॅग्नोलिया वुमन्स असोसिएशन व चंद्रकांत दरोडे विद्यालय, पुणे यांचेकडून शनिवारी (९ ऑक्टोबर) दुपारी तीन ते साडेचार दरम्यान चंद्रकांत दरोडे हायस्कूल, बी.एम.सी.सी. रोड, डेक्कन पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांशी संपर्क साधला असता पुणे शहर पोलिसांकडून महिला सुरक्षेसंदर्भात राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. त्यामध्ये महिला हेल्पलाईन नंबर १०९१, विद्यार्थी बाल हेल्पलाईन १०९८, पोलीस नियंत्रण कक्ष – १०० या हेल्पलाईन तसेच महिला सुरक्षेच्या दृष्टीने व विद्यार्थी मदतीचे दृष्टीने असलेल्या पोलीस दीदी, पोलीस काका, बडी कॉप, भरोसा सेल, दामिनी मार्शल कम्युनिटी पोलिसिंग, महिला बालकांचे संरक्षण याबाबत सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली.
तसेच पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी २४ तास सेवेत आहेत, कोणत्याही तक्रारीसंदर्भात निःसंकोचपणे जवळच्या पोलीस ठाण्यास संपर्क करून आपल्या अडचणी/तक्रारी बाबत माहिती द्यावी, आपणास पोलिसांकडून तत्परतेने मदत केली जाईल, नागरिकांनी पोलिसांविषयी मनामध्ये कोणतीही भीती बाळगू नये, असे सांगितले. तसेच पोलीस महिला टीम सहायक पोलीस निरीक्षक मनीषा टुले, महिला अंमलदार सोनाली बनसुडे, रूपाली गोरंटी, परवीन मुलानी, कोच श्री यादव यांचे कडून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस पथकाकडून स्वसंरक्षण (सेल्फ डिफेन्स ) कसे करावे, सोशल मीडियाद्वारे महिलांची तसेच लहान मुलींची कशी फसवणूक केली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी चंद्रकांत दरोडे विद्यालयाच्या समिती अध्यक्ष गौरीताई ढोले पाटील, समिती सदस्या जयश्रीताई दरोडे, मुख्याध्यापिका ज्योती देडगे (माध्यमिक), संगीता अंत्रे (प्राथमिक), मॅग्नोलिया वुमन्स असोसिएशन ग्रुपचे ॲडमिन गौरी ढोले, नूतनताई बनकर, सदस्या अनुजा गडगे, रेडिओ वन टीमचे स्टेशन हेड विक्रम देशपांडे, प्रोग्रॅमिंग हेड आयुष्य पारवानी, मीनल आर. जे. श्रेया लडकर व इतर सपोर्ट टीम, पुणे शहर पोलिसांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे, सहायक पोलीस निरीक्षक मनिषा टुले महिला अंमलदार, इत्यादी मान्यवर उपस्थित होते, तसेच चंद्रकांत दरोडे विद्यालयाकडील महिला प्राध्यापक व इतर स्टाफ तसेच ५० ते ६० विद्यार्थिनी हजर होत्या.
चंद्रकांत दरोडे विद्यालय व मॅग्नोलिया वुमन्स असोसिएशन ग्रुपने पुणे शहर पोलीस बजावीत असलेल्या कर्तव्याबद्दल कौतुक करून पुणे शहर पोलिसांचे पुणेकर नागरिकांचे वतीने आभार मानले.















