वानवडी पोलिसांची कामगिरी : दोन लाखांची रक्कम ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदली करून एटीएम कार्डची चोरी करणाऱ्या चोरास अटक करण्यात वानवडी पोलिसांना यश मिळाले असून एकूण १,९१,००० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
वानवडी पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील फिर्यादी काशिनाथ विश्वनाथ ढावरे (वय ६१) हे दि. २५ जानेवारी रोजी ईस्ट ट्रिट स्टेट बँक ऑफ इंडिया, बॉम्बे गॅरेज, कॅम्प, पुणे या एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता गेले असता, एटीएममधून पैसे निघत नसल्याने शेजारी असलेल्या अनोळखी इसमाने पैसे काढून देण्यास मदत करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या एटीएमचा पिन नंबर चोरून पाहून एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदली करून फिर्यादी यांचे एटीएम कार्ड व पिन नंबरच्या साहाय्याने वेगवेगळ्या दिवशी वेगवगळ्या एटीएम सेंटरमधून ५,०८,११५ रुपये काढून फिर्यादीची फसवणूक केल्याने सदर गुन्हा दाखल आहे.
दि. २७ सप्टेंबर रोजी दु. तीनच्या सुमारास पोलीस हवालदार अतुल गायकवाड यांना त्याच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे वर नमुद गुन्ह्यातील वृद्ध व अशिक्षित लोकांच्या अज्ञान व साधेपणाचा फायदा घेऊन त्या इसमांचा एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने त्याचेकडील एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांचा पासवर्ड अथवा पिन चेंज करून देण्याचा बहाणा करून पिन नंबर चोरून पाहून चोरी केले.
एटीएम कार्ड व पिन नंबरच्या साहाय्याने वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून पैसे काढून फसवणूक करणारा इसम हा फातिमानगर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुढे असणाऱ्या पंक्चरच्या दुकानासमोर आला आहे, अशी माहिती प्राप्त झाल्याने सदर बातमी सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांना कळवून त्यांनी बातमीचा आशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे यांना कळविली असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले.
सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव व स्टाफ असे बातमीच्या ठिकाणी जाऊन वरील पोलीस स्टाफने त्यास जागी पकडले. मौला गुलाब शेख (वय ३०, रा. मु.पो. होनसाळ, ता. उत्तर सोलापुर, जि. सोलापूर) असे त्याचे असून, त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात वेगवगळ्या बँकेचे आठ एटीएम/डेबिट कार्ड मिळून आल्याने तो मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून वानवडी पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यात आरोपीकडून १,९१,००० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. तसेच आरोपीकडून गुन्ह्याचे तपासात बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा केल्याचे उघडकीस आलेले आहे.
सदरची कारवाई ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, यांचे सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, फौजदार संतोष तानवडे, पोलीस अंमलदार राजू रासगे, अमजद पठाण, संजय बागल, संतोष नाईक, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सरफराज देशमुख, सागर जगदाळे, शिरिष गोसावी, अमित चिव्हे, गणेश खरात, दीपक भोईर व मपोशि राणी खांदवे या विशेष पथकाने केली आहे.















