हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : फुरसुंगीतील मल्हार बिल्डिंगमधील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून पाच लाख ४३ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. फुरसुंगीतील मल्हार बिल्डिंगमध्ये शनिवारी (दि. ९ ऑक्टोबर २०२१) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
रोहित केंडे (वय ३४, रा. फुरसुंगी, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा फुरसुंगीतील मल्हार बिल्डिंगमधील फ्लॅट कुलूपबंद होता. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप उचकटून घरातील पाच लाख ४३ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहेत.
