दत्तवाडी पोलिसांत चौघांवर गुन्हा : सिंहगड रोड येथील सई हेरिटेज सोसायटीजवळील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मित्रांसोबत मद्यप्राशन करताना किरकोळ वाद झाला, त्याचे पर्यवसन मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना सिंहगड रोड येथील सई हेरिटेज सोसायटीच्या मंदिराजवळ सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) मध्यरात्री घडली आहे.
मंदार जोगदंड (वय-२३, रा. साने गुरुजी वसाहत,पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोन्या खुळे, राजू कोतवाल, इजगद, चेतन बनसोडे (सर्व रा. दत्तवाडी, पुणे) या आरोपींविरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शुभम दत्ता अडसुळ (वय-२३) याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री आरोपी इसम व मयत हे दारु पीत बसले होते. त्यावेळी मंदार याने सोन्या खुळे यास शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरुन खुळे व त्याचे साथीदार मित्रांनी मंदार यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत मंदार याचा जागीच मृत्यु झाला आहे. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज पाटील पुढील तपास करत आहे.
