पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे : आयुक्तालय क्षेत्रात २ ते १५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान बंदी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : जनतेच्या विविध मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद आणि उपोषणासारखे आंदोलने, अतिक्रमण हटविण्याच्या कारवायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३७(१),(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
पुणे शहरात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधीनियम १९५१च्या कलम ३७(१),(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करण्यास पुरेसे व सबळ कारण आहे. आयुक्तालय कार्यक्षेत्रात २ नोव्हेंबर २०२१ मध्यरात्री १२.०० वाजल्यापासून ते १५ नोव्हेंबर २०२१ मध्यरात्री १२ पर्यंत १४ दिवसांसाठी आदेश लागू केले आहेत.
कोणतेही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे. दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधणे बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतेही वस्तू बरोबर नेणे.
कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांच्या चित्रांचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे. सभ्यता अगर नीतीमत्तेस धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालीत आहे.
परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, अशा पद्धतीने वर्तन करणे. शासन किंवा मनपा आयुक्त पुणे यांच्या कोरोना विषयक प्रतिबंधक उपाययोजना व मार्गदर्शक तत्वे व त्यातील तरतुदी याही या दरम्यान लागू राहतील. पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव करण्यास पूर्व परवानगी घेणे किंवा काढण्यास बंदी आहे. मात्र, शासन सेवेतील व्यक्तींना व ज्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, त्यांना लागू होणार नाही.
सर्व पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आदेशाच्या प्रती महत्त्वाच्या आणि सार्वजनिक ठिकाणी चिकटवावेत, तसेच, ध्वनीक्षेपकाद्वारे किंवा अन्य मार्गाने प्रक्षेपित करून योग्य ती प्रसिद्धी करावी, योग्य नोंदी अभिलेखावर ठेवाव्यात, असे म्हटले आहे.
