वडगावशेरीमध्ये ती फिरत होती : चंदननगर पोलिसांनी तातडीने घेतली दखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : उत्तर प्रदेशमधील मुलगी नोकरीच्या आमिषाने वडगावशेरी, पुण्यामध्ये आली. ज्या महिलेने तिला बोलावले तिचा मोबाईल बंद होता. मात्र, तिच्याविषयी चंदननगर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तिला उत्तर प्रदेश येथे रेल्वेने सुखरूप पोहोचविले. पोलिसांच्या तत्परतेमुळे तिच्यावरील अनर्थ टळला.
वडगावशेरी परिसरात एक मुलगी फिरत असून, तिचे कोणीही नातेवाईक नाहीत, तिच्यावर अनर्थ प्रसंग ओढवू शकतो, अशी माहिती चंदननगर पोलीस स्टेशनला मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी तात्काळ पोलीस उनपनिरीक्षक अरविंद कुमरे यांना तपास करण्यास सांगितले.
दरम्यान, कुमरे यांनी पोलीस अंमलदार अमित कांबळे व महिला पोलीस नाईक मनिषा जगताप यांच्या मदतीने मुलीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. त्यावेळी तिने सांगितले की, तोंडओळख असलेल्या सरिता ऊर्फ आरती (पूर्ण नाव माहिती नाही), रा. वडगावशेरी हिने पुण्यात नोकरीला लावते म्हणून बोलावून घेतले. मात्र, पुण्यात आल्यानंतर तिचा मोबाईल बंद लागला. माझ्याकडील पैसे संपले कोणी ओळखीचे नाही. यावेळी एका महिलेने मदत करते, तू इथेच थांब असे सांगितले. एवढ्यात तुम्ही मला देवासारखे भेटलात असे तिने सांगितले.
पोलिसांनी तिला चंदननगर पोलीस स्टेसनमध्ये आणले आणि वरिष्ठांना माहिती दिली. त्यानुसार तिला रेल्वेचे तिकीट काढून, स्टेशन डायरीमध्ये नोंद करीत तिच्या आईकडे सुखरूप पाठवून दिले. दरम्यान, ती मुलगी उत्तर प्रदेशमध्ये पोहोचल्याची माहिती घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलीस शिपाई अमित कांबळे, महिला पोलीस नाईक मनिषा जाधव यांनी त्या मुलीला मदत करून सुखरूप उत्तरप्रदेश येथे आईकडे पाठविले.
