बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी : नाकाबंदी दरम्यान संशयावरून केली कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : आंतरराज्यीय दरोडे व चोरी करणाऱ्या टोळीच्या बार्शी तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या. काटेगाव (ता. बार्शी) येथे नाकाबंदी सुरू असताना संशयावरून जीपमधील आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयाने आरोपींना ५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दशरथ काळे, (वय २३), रमेश काळे (वय २४), तानाजी काळे (वय २५), मोहन काळे (वय ३५), शहाजी पवार (वय २२), जालिंदर काळे (वय ५० ), दिलीप पवार (वय ३५), हेमंत नाना काळे (वय ४०, सर्व रा. लक्ष्मी पारधीपेढी, तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद ), उद्धव ऊर्फ सोन्या शिंदे (वय २१, रा. बावी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, काटेगाव (ता. बार्शी) हद्दीत नाकाबंदी दरम्यान संशयित वाहनांसह व्यक्तींची चौकशी सुरू होती. त्यावेळी संशयिताची माहिती ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टाटा सुमो जीप क्र. एमएच-२५-टी-०६५६ अडवली. जीपमधील संशयितांकडे विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
दरम्यान, पोलिसांनी पोलीस फोर्स मागवून गाडी ताब्यात घेऊन सर्वांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे तलवार, लोखंडी , कटावणी, धारदार कत्थी, स्क्रू ड्रायव्हर, गलोर, ॲडजेस्टेबल पाना, लाल चटणी पूड असे साहित्य मिळाले. सर्व आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून अटक केली. मा. न्याय दंडाधिकारी धडके यांनी ५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण जाधव, राजेंद्र मंगरुळे, सर्जेराव गायकवाड, दशरथ बोबडे, शंकर वाघमारे, अमोल माने, तानाजी धिमधिमे, धनराज केकाण, भांगे, अभय उंदरे, महेश डोंगरे, काटेगाव पोलीस पाटील अनिल जाधव, ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य चैतन्य जाधव, विनायक जाधव, अनंता जाधवर, कृष्णूर्ती मुंढे, लक्ष्मण जाधवर, कल्याण वरिष्ठ जाधवर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
