सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : सीआयडी मालिका पाहून रचला खूनाचा कट
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सीआयडी मालिका पाहून खुनाचा कट रचून ७० वर्षीय महिलेचा खून करणाऱ्या दोन विधिसंघर्षित बालकांना सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेऊन एक लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हिंगणे खुर्द येथे ३० ऑक्टोबर २०२१ रोजी खून करून चोरी केल्याची घटना घडली होती.
शालिनी बबन सोनवणे (वय ७०, रा. सायली हाईट्स, फ्लॅट नं.७, हिंगणे खुर्द, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, हिंगणे खुर्द येथे घरामध्ये चोरी झाली असून, वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्याची माहिती ३० ऑक्टोबर २०२१ रोजी नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत तपास सुरू केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणी नसल्याने सीसीटीव्हीचे फुटेजच्या माध्यमातून तपासाची चक्रे फिरविली. दरम्यान, पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी यांना घटनास्थळाजवळील रोकडोबा मंदिराजवळ पाणीपुरी खाऊन दोघेजण गडबडीने जात असल्याची माहिती लहान मुलांकडून मिळाली. त्या माहितीच्या आधारे दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
 वृद्ध महिलेकडे पैसे असून, ते कोठे ठेवले याबाबत त्यांना माहिती होती. विधिसंघर्षित बालकांनी दोन महिन्यापूर्वी सीआयडी मालिका पाहून चोरी करण्याचा कट रचला आणि घराची चावी चोरली. वृद्ध महिला टीव्ही पाहत असताना पाठीमागून ढकलून नाक-तोंड दाबून खून केला. त्यानंतर ९३ हजार रुपये रोख ६७ हजार रुपयांचे दागिने असा एकूण एक लाख ६० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. यावेळी हाताचे ठसे कोठे उमटू नये म्हणून हँडग्लोज वापरल्याची विधिसंघर्षित बालकांनी सांगितले. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पुढील तपास करीत आहेत.
पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, पोलीस आयुक्त सुनील पवार, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले,पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, सचिन माळवे, शंकर कुंभार, किशोर शिंदे, अविनाश कोंडे, अमेय रसाळ, सुहास मोरे, इंद्रजीत जगताप, अमोल पाटील, सागर भोसले, विकास बांदल, विकास पांडोळे, अमित बोडरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 
			


















