मित्राची कागदपत्रे वापरून मिळविले सीमकार्ड : त्यावरून केले आर्थिक व्यवहार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेतीसाठी कर्ज मिळवून देतो आणि नीलेश घायवळकडून नोकरी लावून देतो, असे सांगून मित्राची कागदपत्रे घेऊन त्यांचा गैरवापर करणाऱ्या नीलेश घायवळच्या साथीदारावर वारजे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अमोल दत्ता लाखे (रा. लाखणगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात सुरेश जालिंदर ढेंगळे (वय ३२, रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ एप्रिल २०१९ ते २९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅंगस्टर नीलेश घायवळ, अमोल लाखे आणि इतरांवर वारजे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा आधीच दाखल आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना कळले की अमोल लाखे वापरत असलेला मोबाईल क्रमांक हा सुरेश ढेंगळे यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. त्यामुळे पोलिसांनी सुरेश यांना चौकशीसाठी बोलावले.
त्यांनी सांगितले की, २०१३-१४ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांची अमोल लाखे यांच्याशी ओळख झाली होती. दोघांचे गाव (लाखणगाव) एकच असल्याने त्यांच्यात मैत्री निर्माण झाली होती. एप्रिल २०१९ मध्ये अमोल लाखे हा सुरेश याला भेटला आणि “मी तुला शेतीसाठी आणि इतर व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो.
माझ्या पुण्यात चांगल्या ओळखी आहेत. नीलेश घायवळ आणि त्याच्या काही मित्रांशी माझे संबंध आहेत. जमले तर तुला नोकरीसुद्धा लावून देतो. तू पुण्याला येताना तुझी कागदपत्रे घेऊन ये,” असे सांगितले.
त्यावर विश्वास ठेवून सुरेश यांनी आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन पुण्यात येऊन वारजे पुलाखाली अमोल लाखे याला भेट दिली. लाखे याने त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, शेती उत्पन्नाचे दाखले, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि इतर कागदपत्रे घेतली. त्यानंतर “कर्ज मंजूर झाल्यावर तुला संपर्क करतो,” असे सांगून तो निघून गेला.
दरम्यान, काही दिवसांनी कर्जाची गरज संपल्याने आणि लॉकडाऊन सुरू झाल्याने सुरेश यांनी त्या कागदपत्रांविषयी चौकशी केली नाही. मात्र, अमोल लाखे याने त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून सुरेश यांच्या नावावर रिलायन्स जिओ कंपनीचे सीमकार्ड घेतले आणि त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला.
त्यामुळे सुरेश यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

















