धर्मदाय आयुक्तांचा निर्णायक आदेश : विक्री रद्द, मालमत्ता पुन्हा ट्रस्टकडे
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे: पुण्यातील सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट (एच.एन.डी. जैन बोर्डिंग) या ऐतिहासिक जैन संस्थेच्या भूमी विक्री प्रकरणात अखेर न्याय मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचे धर्मदाय आयुक्त अमोघ कलोति यांनी आज (३० ऑक्टोबर २०२५) दिलेल्या निर्णायक आदेशाद्वारे ४ एप्रिल २०२५ रोजी दिलेला विक्री मंजुरी आदेश रद्द केला असून, विक्रीखत व पावर ऑफ अटर्नी रद्द करून मालमत्ता पुन्हा ट्रस्टच्या ताब्यात आणण्याचे निर्देश दिले आहेत.
या आदेशानुसार “गोखले लँडमार्क्स एलएलपी” या डेव्हलपर फर्मशी झालेला व्यवहार पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. ट्रस्टने विक्रीतून मिळालेली रक्कम (टीडीएस वगळून) परत करणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि संबंधित मालमत्ता पुन्हा ट्रस्टच्या नावावर नोंदविण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जैन समाजात आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या अन्यायकारक विक्रीविरोधात समाजातील काही जागरूक सदस्य अक्षय जैन, आनंद कांकरिया, स्वप्निल गंगवाल आणि महावीर चौगुले यांनी सर्व पुरावे व दस्तऐवज गोळा करून संघर्षाची दिशा ठरवली. आचार्य गुरुदेव गुप्तिनंदीजी म. सा. यांच्या प्रेरणेने आणि ॲड. योगेश पांडे, अण्णा पाटील, चंद्रकांत पाटील, सुकौशल जिंतूरकर यांच्या कायदेशीर मार्गदर्शनाखाली ही लढाई धर्मदाय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचली.
जैन समाज नेहमीच अहिंसेच्या मार्गाने चालत आला आहे आणि या लढ्यालाही तोच मार्ग अनुसरला गेला. आज या प्रकरणात १०० टक्के न्याय मिळाला आहे.- लक्ष्मीकांत खाबिया
ही केवळ एका मालमत्तेची लढाई नव्हती, तर विद्यार्थ्यांच्या हक्कांची, समाजाच्या श्रद्धेची आणि न्यायाच्या तत्त्वांची लढाई होती. या संघर्षात अनेक अडथळे आले, परंतु जैन समाजातील सर्व घटक, विविध धर्म-पंथातील लोक आणि अनेक राजकीय नेते आमच्या पाठीशी उभे राहिले.- अक्षय जैन

















