खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरची फसवणूक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरची आर्थिक परिस्थितीची माहिती काढून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना वारजे येथील बांधकाम साईटवरील दोन फ्लॅट घेण्यास प्रवृत्त केले. प्रत्यक्षात त्यांच्याकडून पैसे घेऊन ते फ्लॅट बांधकाम व्यावसायिकाने दुसऱ्या व्यक्तीला विक्री करुन डॉक्टरांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
खडक पोलिसांनी प्रियंक देवमन पटेल (रा. वारजे), वैभव एकनाथ मारकड (रा. नारायण पेठ) आणि चेतन रावजीभाई पटेल (रा. एकबोटे कॉलनी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. राजेश जगन्नाथ पटेल (वय ४७, रा. खारघर, मुंबई) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी फिर्यादीची आर्थिक परिस्थितीची माहिती काढून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. वारजे येथील बांधकाम साईटमध्ये दोन फ्लॅट घेण्यास प्रवृत्त केले. या फ्लॅटची किंमत एका वर्षात दुप्पट होईल, असे आमिष दाखवले. याबाबत त्यांनी ५ मे २०१४ रोजी करार करुन फिर्यादी यांनी दोन फ्लॅट विकत घेतले. त्यासाठी मारकड डेव्हलपर्स व बालाजी ग्रुप या नावावर त्यांनी ३९ लाख रुपये दिले. या फ्लॅटचा ताबा डिसेंबर २०१५ मध्ये देण्याचे आश्वासन दिले होते.
प्रत्यक्षात त्यांनी हे फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला विकून फिर्यादीची फसवणूक केली.
